Authentic Koli Style Pomfret Fish Curry
अस्सल कोळी पद्धतीचे पापलेटच कालवणहम्म....काय जिभेला पाणी सुटले ना ?..खरंय पापलेटच नाव काढले कि जिभेला पाणी सुटलेच पाहिजे.
मी तुम्हाला अस्सल कोळी पद्धतीचे पापलेटच कालवण शिकवणार आहे.
माझे मूळ गाव मुंबई,माहीम. लहान पणापासून जेवण बनवण्याची खूप आवड. हे पापलेटच कालवण बनवणं अगदी सोपं आणि खूपच चविष्ट.
साहित्य:
- पापलेटचे तुकडे- १० ते १२ ( दुसरे मासे वापरले तरी चालतील जसे घोळ,रावस,दाढा )
- टोमॅटो ग्रेव्ही - १ लहान वाटी ( २ टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेणे )
- लसूण पाकळ्या - ८ ते १०
- आले - १ इंच
- हिरव्या मिरच्या - २ ते ३
- कोथिंबीर - २ टेबलस्पून
- लाल तिखट - १ टीस्पून
- कोळी मसाला -१.५ टीस्पून (कोळी मसाला नसल्यास मिक्स मसाला टाकल्यास चालेल )
- हळद - १/२ टीस्पून
- आमसूल चा कोळ - १ टेबलस्पून ( आमसूल नसल्यास चिंचेचा कोळ वापरा )
- मीठ चवीनुसार
- तेल - ३ टेबलस्पून
- पाणी - १/२ ते १ ग्लास ( ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे )
कृती:
- लसूण पाकळ्या,आले,हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर जरुरीनुसार पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
- मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये मिक्सर वर वाटलेला हिरवा मसाला टाकून चांगले परतवून घ्या.
- हिरवा मसाला चांगला परतवून झाला कि त्यामध्ये टोमॅटो ग्रेव्ही टाका आणि ३ ते ४ मिनटे चांगले शिजवून घ्या.
- लाल तिखट, कोळी मसाला, हळद, मीठ टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
- स्वच्छ धुतलेले पापलेटचे तुकङे घालून व्यवस्थित परतवून घ्या.
- आमसूल चा कोळ घालून पुन्हा परतवून घ्या.
- ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घालून व्यवस्थित परतवून घ्या .
- साधारण आचेवर ५ मिनिटे शिजवून घ्या.
- आपले कोळी पद्धतीचे पापलेटचे कालवण तयार .
टीप:
- आमसूल किंवा चिंचेचा कोळ लवकर आणि व्यवस्थित होण्यासाठी ते साधारण गरम पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावे.
- कोळी मसाला नसल्यास तुम्ही मिक्स मसाला चा वापर करू शकतात.
- कुठलेही मासे शिजण्यास जास्त वेळ लागत नाही.( कवचधरी मासे, माकुल सोडल्यास ) त्यामुळे ५ ते ७ मिनिटे पेक्षा मासे जास्त शिजवू नये. ( बोंबील शिजण्यास फक्त एक उकळी पुष्कळ होते) जास्त शिजवल्यास मासे फुटतात किंवा गळतात. ( स्पेशल कोळी टिप्स )
- हे पापलेटचे कालवण भातासोबत खूपच छान लागते.

Comments
Post a Comment